नागपूर, दि. २७.०७.२०२६: बँक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटनांच्या आंदोलनात प्रत्येक कर्मचाऱ्याचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन इनबोकचे वरिष्ठ उपाध्यक्ष नागेश दंडे यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सर्व कर्मचारी चांगले वेतन, पाच दिवसीय बँकिंग, रिक्त पदांवर भरती, कामाचा वाढता ताण कमी करणे आणि सेवा शर्तींमध्ये सुधारणा या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतात. मात्र, आंदोलन, धरणे, निदर्शने किंवा संपाची वेळ आली की मोठ्या प्रमाणात कर्मचारी त्यापासून दूर राहतात. परिणामी, आंदोलनाची ताकद कमी होते आणि सरकार तसेच बँक व्यवस्थापनावर अपेक्षित दबाव निर्माण होत नाही.

दंडे म्हणाले की, केवळ काही हजार कार्यकर्त्यांच्या बळावर लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या हक्कांची लढाई जिंकणे शक्य नाही. कोणत्याही आंदोलनाचे यश हे त्यामागील जनसहभाग, एकजूट आणि निर्धारावर अवलंबून असते. कर्मचारी स्वतःच आंदोलनात सहभागी होत नसतील, तर त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता कमी होते.

अलीकडेच जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारची सक्ती नसतानाही हजारो नागरिकांनी सहभागी होऊन बँक कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. हे दर्शवते की, जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा आवाज अधिक प्रभावी ठरतो.

दंडे यांच्या निवेदनात बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये पाच दिवसीय बँकिंग, बँक कर्मचारी पेंशन अद्यावत करणे, आणि PLI Scheme समस्यांचे द्विपक्षीय चर्चेद्वारे निराकरण करण्याची मागणी समाविष्ट आहे. याबरोबरच, बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रेरित करण्यासाठी युनायटेड फोरम आफ बँक युनियन्सने समर्थन दिले आहे.

दंडे यांनी बँक कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यासाठी उभे राहावे आणि आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. एकत्र येऊनच ते त्यांच्या मागण्यांची पूर्तता करू शकतील.