कल्याणकारी योजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नागपूर: 

दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समतादूत विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील श्री. दादासाहेब कुंभारे सभागृहात २३ सप्टेंबर रोजी कल्याणकारी योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, समतादूत मंजुषा मडके, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. विकास सिडाम आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. स्नेहा नाईक उपस्थित होते.

प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांनी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजात समता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित होऊन विकासाची वाट निर्माण होते, असे प्रतिपादन केले. हृदय गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंजुषा मडके यांनीही विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश कर्पे यांनी केले. आभार प्रा. स्नेहा नाईक यांनी मानले. यावेळी प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.