नागपूर,
कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी तसेच स्नायू आणि सांध्यांच्या विविध समस्यांनी त्रस्त नागरिकांसाठी इंदिरा साठे ट्रस्टतर्फे रविवार, २९ नोव्हेंबर रोजी मोफत वेदना व्यवस्थापन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत वसंतराव साठे बंगला, अहिल्या मंदिराजवळ, साठे मार्ग, धंतोली, नागपूर येथे होणार आहे.
शिबिरात सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, टेनिस एल्बो, फ्रोजन शोल्डर, टाचदुखी, संधिवातासह विविध शारीरिक वेदनांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. हातांच्या बोटांच्या साहाय्याने विशेष स्टिम्युलेशन तंत्राचा वापर करून औषधविरहित वेदना व्यवस्थापनाच्या पद्धतींची माहिती दिली जाईल. तसेच तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.मोबाईल-संगणकाचा अतिवापर, चुकीचे पोश्चर आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही शारीरिक वेदनांच्या तक्रारी वाढत आहेत. योग्य जीवनशैली, नियमित हालचाली आणि पोश्चरमधील सुधारणा याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.सुनीती बोधनकर, डॉ. उदय बोधनकर, विजय गुप्ते, डॉ. प्रवीण डबली आणि ट्रस्टच्या सदस्यांनी नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक नसून इच्छुकांनी थेट शिबिरस्थळी उपस्थित राहून नाव नोंदवावे.



