नागपूर :
दीनदयाल नगर प्रभाग ३५ परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा व चिखल साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात भटके कुत्रे, जनावरे तसेच किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेची कचरा संकलन गाडी दिवसातून तीन वेळा येत असली तरी काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने समस्या कायम आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कचरा व चिखलामुळे डास आणि इतर किड्यांचे प्रमाण वाढले असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविणे, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे तसेच कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



