नागपूर : 

भगवान महावीर जैन सेवा केंद्रातर्फे पुष्य नक्षत्राच्या पावन मुहूर्तावर ‘साधर्मिक भोजन योजनेचा’ शुभारंभ करण्यात आला. परम पूज्य आचार्य भगवंत व साध्वीजी महाराज साहेब यांच्या शुभाशीर्वादाने हा उपक्रम सुरू करण्यात आला.

या योजनेंतर्गत इतवारी, वर्धमान नगर संघ तसेच स्थानक परिसरातील गरजू साधर्मिक कुटुंबांना दररोज एक वेळचे शुद्ध शाकाहारी व कांदा-लसूणविरहित भोजन घरपोच दिले जाणार आहे. आजारी, वृद्ध तसेच एकटे राहणाऱ्या गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळणार असून लाभार्थ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत.

कार्यक्रमात साध्वीजी लब्धियशाश्रीजी महाराज साहेब यांनी आशीर्वचन देऊन उपस्थितांना सेवाकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी विपिन मेहता होते. प्रमुख अतिथी राजूभाई मेहता व अशोकभाई भायाणी यांनी योजना सातत्याने सुरू राहण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.दिलीप गांधी व डॉ. दीपक शेंडेकर यांनीही उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन पियुष शहा यांनी केले, तर आभार रवींद्र वोरा यांनी मानले.