नागपूर
नागपूर महानगरपालिका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि लोक समस्या संशोधन व लोककल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुपोषण पंधरवडा’ अंतर्गत आशा सेविकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विदर्भ प्रांताचे सह संपर्क प्रमुख अरविंदकुकडे, समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीपगुप्ता, सचिव माधव उराडे, उपाध्यक्ष मिलिंद पाठक, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड आणि शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात संतुलित आहार, माता व बालकांचे पोषण, मातृ आरोग्य, मानसिक आरोग्य तसेच जंक फूड व अतिरिक्त साखरेचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विवेकानंद मिशन नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य व भारुडातून पोषणाचा संदेश दिला. यावेळी डॉ. नीलिमा जोशी, डॉ. सुषमा देशमुख आणि डॉ. गिरीश चरडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आशा सेविकांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभव मांडले.कार्यक्रमाच्या वेळी सुपोषण विषयक पोस्टरचे लोकार्पण करण्यात आले. धान्य प्रदर्शन व विविध धान्यांपासून साकारलेली रांगोळी विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका पेट्टेवार यांनी केले, तर आभार वृंदा संगमनेरकर यांनी मानले. उपस्थितांनी पारंपरिक भारतीय आहाराचा स्वीकार व प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.



