नागपूर: 

अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच आणि राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच, महाल शाखेने ओंकारनगर येथील पुण्याई वृद्धाश्रमात औषधदानाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचा उद्देश वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधे प्रदान करणे हा होता.भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना तीन महिन्यांसाठी पुरतील इतकी औषधे देण्यात आली. या औषधांमध्ये रक्तदाबावरील औषधे, मल्टिव्हिटॅमिन, कॅल्शियम, खोकल्याचे सिरप, वेदनाशामक स्प्रे आणि मास्कचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती खोब्रागडे उपस्थित होत्या. प्रफुल्ल रोडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सविता मांडवगडे यांनी प्रास्ताविक केले, तर संजय आगरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते दिलीप सावळकर, शाखाध्यक्ष राजेंद्र सोनटक्के, महामंत्री मनोज मांडवगडे यांच्यासह मंचाचे अनेक सदस्य उपस्थित होते.