नागपूर: 

विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नंदनवन येथे वैदर्भीय महिला संस्थेच्या संस्थापिका स्व. डॉ. प्रभाताई रोकडे (सपकाळ) यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त ९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना आणि कला व वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध जनोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उपक्रमाचे स्वरूप

या उपक्रमामध्ये आयुष्मान कार्ड, आभा कार्ड तयार करणे, आधार कार्ड नोंदणी व अद्ययावतीकरण तसेच आरोग्य, नेत्र, कर्ण, रक्तदाब, रक्तशर्करा आणि रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये स्वयंरोजगाराची जाणीव निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शनही आयोजित करण्यात आले.

उद्घाटन समारंभ

प्रदर्शनाचे उद्घाटन वैदर्भीय महिला संस्थेच्या अध्यक्षा सावित्रीताई रोकडे आणि चंद्रशेखर रोकडे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमांचा सुमारे २५० विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेतला.

सहयोगी संस्थांचे योगदान

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. दीपाली भावे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय सिंगनजुडे, डॉ. विजया राऊत, डॉ. मंगेश शामकुरे, डॉ. श्रद्धा अग्रवाल, प्रा. प्रणय दाते, प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. भारतीय पोस्ट ऑफिस, स्व. भानूताई गडकरी ग्रामीण विकास संस्था आणि डायग्नोप्लस पॅथॉलॉजी यांच्या चमूनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले.