नागपूर :
नागपूर शहरातील पारंपरिक व ऐतिहासिक विहिरींच्या संवर्धनासाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने अधिकृत आदेश जारी केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विहिरींच्या स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील असलेले जलअभ्यासक व जलयोद्धा डॉ. प्रवीण डबली यांच्या मोहिमेला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
'विहिरींकडे चला' अभियानांतर्गत ८६० पारंपरिक विहिरींची स्वच्छता आणि ४०० विहिरींमध्ये बोरिंग करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. मोतीबाग येथील २०० वर्षे जुन्या भोसलेकालीन विहिरीच्या पुनरुज्जीवनातही डॉ. डबली यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.नागपूरचा हा जलसंवर्धन पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर राबविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकार, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ऐतिहासिक विहिरी व पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्यास भूजल पातळी वाढून पाणीटंचाईवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



