प्रतापनगर येथील दुर्गा मंदिरात १००८ पणत्यांच्या प्रकाशात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित या दीपोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दीपोत्सवाचा आनंद लुटला.

मंदिर परिसरात आकर्षक मोराची रांगोळी साकारून ती रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित करण्यात आली होती. या मोराच्या कलाकृतीभोवती १००८ पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सवाची मनोहारी सजावट करण्यात आली. दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने उजळून निघाला.

दीपोत्सवानंतर मंदिरात दर मंगळवारी होणाऱ्या सामूहिक उपासनेला प्रारंभ झाला. यावेळी रामरक्षा पठण आणि मारुती स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष श्री. श्याम काळे, सौ. स्नेहा काळे तसेच सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दीपोत्सव भक्तिभावात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.