नागपूर, 

 ऐतिहासिक जलव्यवस्थेचा वारसा जतन व्हावा, या उद्देशाने नागपूर प्लॉगर्सतर्फे पांढराबोडी येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला. इतिहास अभ्यासक व वास्तुविशारद संदीप पाथे यांनी गोंडकालीन पायऱ्यांची विहीर व तलावाच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती  दिली.

एकेकाळी 27.10 एकर क्षेत्रात असलेला तलाव आता केवळ 6.20 एकरवर उरला आहे.  विहिरीच्या दोन्ही बाजूंना पायऱ्या असून एका बाजूने ती तलावाच्या बांधाला जोडलेली आहे. विदर्भातील ही एकमेव अशा प्रकारची रचना असल्याचे त्यांनी सांगितले. या विहिरीचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी होत असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.या उपक्रमात नागपूर प्लॉगर्स, रेड स्वास्तिक व इतर सामाजिक संस्था नागरिकांना ऐतिहासिक वारशाची ओळख करून देत आहेत. तलावाची पाणीपातळी पूर्ववत करावी, परिसराचे नैसर्गिक सौंदर्य जपावे आणि तलावाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.