नागपूर
प्राचीन श्री शिव मंदिर दीपावली मिलन आयोजन समिती आणि कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसॅबिलिटी (COMHAD UK) यांच्या संयुक्त विद्यमाने बेलिशॉप रेल्वे कॉलनी, कामठी रोड येथील प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात १०० गरजू मुलांसोबत दीपावली मिलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे आमदार डॉ. नितीन राऊत आणि आमदार संजय भेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी भूषविले.या सोहळ्यासाठी अनाथ सेवा आश्रमातील मुले-मुली, जिव्हाळा परिवारातील मुली तसेच प्रागतिक माध्यमिक विद्यालय, कोराडी येथील फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थिनींना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सर्व मुलींना प्रत्येकी दोन जोड नवीन कपडे भेट देण्यात आले. फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थिनींना खेळासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फुटबॉल शूज प्रदान करण्यात आले. COMHAD UK तर्फे मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले, तर विविध सहकारी आणि दानशूर व्यक्तींनी मुलांच्या गरजेनुसार आवश्यक साहित्य भेट दिले.मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला विशेष आतषबाजीचा कार्यक्रम हे सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. रंगीबेरंगी रोषणाई आणि आतषबाजी पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमातून मुलांना केवळ भेटवस्तूच नव्हे, तर कुटुंबासारखी आपुलकी आणि सामूहिक उत्सवाचा आनंद अनुभवता आला.
विशेष अतिथी म्हणून COMHAD UK चे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर, आंध्र असोसिएशनचे अध्यक्ष पी. एस. एन. मूर्ती, दिल्ली येथून आलेले Sarkaritel.com चे मुख्य संपादक अमेय साठे, विजय गुप्ते, नगरसेवक अभिषेक शंभरकर, नगरसेवक गौतम अंबादे, उमेश चौकसे, माजी नगरसेवक सरदार नवनीत सिंह तुली, डॉ. संजय मालवीय, जगदीश गुप्ता, डॉ. प्रकाश कलवानी, प्रकाश माहुले, जालान आणि दीपक बागडी यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक व समाजसेवक उपस्थित होते.या आयोजनाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे प्रवीण डबली, पंडित कृष्णमुरली पांडे, पी. सत्याराव, प्रकाशराव (गुंडुराव), जुगलकिशोर शाहू, प्रेमलाल यादव, सी. राजाराव, किशोर रोहिडा, विश्वजीत डे, राजेश द्विवेदी, पी. विजय, श्रीकांत रॉय, गणेश कोतुलवार, जी. एन. पटनायक, सोनू, पुष्पा नागोत्रा, शशी यादव, पी. कन्याकुमारी, सरला बैस, पद्मा राव, सुशीला यादव आणि विलास खाडे यांच्यासह अन्य सदस्यांचे विशेष योगदान लाभले. तसेच सर्व सहकारी, स्वयंसेवक, दानशूर व्यक्ती आणि हितचिंतकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले.
.



