दिव्यांगानी स्वहस्ते बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री

नागपूर 

इंद्रधनू विकलांग सेवा संस्थेतर्फे   प्रार्थना भवन, शांतीनिकेतन कॉलनी, प्रतापनगर येथे दिव्यांगांनी स्वहस्ते बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन नेत्रतज्ञ डॉ वर्षा रहातेकर यांनी  केले. अस्थिव्यंग, मतीमंद, मूकबधीर, अंध व्यक्तिंनी त्याचबरोबर दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपआपले कला कौशल्य वापरून तयार केलेल्या विविध वस्तु प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळी जवळ असल्याने दिपमाळा, मोत्यांच्या रांगोळ्या, पणत्या, वाती इत्यादी वस्तुंसोबत बॅगज, पर्सेस, कपडे, स्वहस्ते बनविलेले फिनाईल यांचे स्टॉल विक्रीसाठी लावण्यात आले होते. लोकांचा उत्तम प्रतिसाद प्रदर्शनाला लाभला. दिव्यांगांच्या कला गुणांना वाव मिळावा व  दिवाळीसाठी  त्यांच्याजवळ पैसा असावा या हेतूने इंद्रधनू दरवर्षी प्रदर्शन लावते असे संस्थेच्या अध्यक्ष कविता लंके म्हणाल्या. 

दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरणाने करण्यात आला. परिक्षक आर्टिस्ट निलम जोशी यांनी  स्टॉलचे निरीक्षण करून नंबर काढले. प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केलेल्या अलका जोग व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. दिवाळी निमीत्य सर्व स्टॉलधारकांना संस्थेतर्फे भेटवस्तू देण्यात आली. इंद्रधनूच्या या उपक्रमामुळे दिव्यांग स्टॉलधारकांमधे एक नवा उत्साह आणि जगण्याची नवी उमेद निर्माण झाली. सामुहीक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.