नागपूर,

नरेंद्र नगरातील सप्तगिरी नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ सप्टेंबर रोजी तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या २० वर्षांपासून या उत्सवाची परंपरा जपली जात आहे.यंदाच्या उत्सवात परिसरातील सुमारे १०० ते १२५ बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बालगोपालांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलांसह तसेच पारंपरिक वेशभूषेत उत्सवात सहभाग नोंदविला. उत्कृष्ट नंदी सजावट व वेशभूषेसाठी बालगोपालांना शालेय उपयोगी साहित्याची बक्षिसे देण्यात आली.


उत्सवानंतर गोपाळकाला आयोजित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सप्तगिरी नगर परिवारातील सदस्यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. पालकांचीही उपस्थिती लाभली. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत या उत्सवातून बालगोपालांमध्ये आनंद, उत्साह आणि एकोप्याची भावना निर्माण झाली.