नागपूर 

 इंद्रधनू विकलांग सेवा संस्थेतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रार्थना सभागृह, शांतीनिकेतन कॉलनी येथे पार पडला. विविध दिव्यांग शाळांमधील सुमारे ६० विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुमेहतज्ज्ञ डॉ. संकेत पेंडसे, तर प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे नागपूर क्षेत्र सचिव अजय गजानन सायगावकर उपस्थित होते. डॉ. पेंडसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशामुळे कुटुंबाचाही उत्कर्ष होतो, असे सांगितले. सायगावकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.गणित व विज्ञान विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तू व फराळाची पाकिटे देण्यात आली. कविता लंके यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मनोहर शिनखेडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.