नागपूर :
व्हीएनआयटी, नागपूर येथे ९ व्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त सात दिवसीय निःशुल्क निसर्गोपचार शिबिराचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. व्हीएनआयटीचा रसायन अभियांत्रिकी विभाग व आरोग्य केंद्र तसेच अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सक संशोधन महासंघ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गांधी विचार विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद वाटकर यांनी प्राकृतिक चिकित्सा ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी असल्याचे सांगितले. महात्मा गांधी यांनी उरुळी कांचन येथे प्राकृतिक चिकित्सेला प्रोत्साहन देऊन जनकल्याणासाठी तिचा प्रसार केला, असे त्यांनी नमूद केले.प्रमुख अतिथी डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांनी प्राकृतिक चिकित्सा आणि आरोग्यविषयक शिक्षणाचे महत्त्व विशद केले. डॉ. प्रवीण डबली यांनी योग्य शारीरिक स्थिती, संतुलित जीवनशैली, योग आणि नियमित व्यायामाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीएनआयटी आरोग्य केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज धुळे होते.
ABPCSM चे अध्यक्ष डॉ. अनिल वाघ यांनी प्रास्ताविकातून शिबिराची माहिती दिली. सात दिवसांच्या या शिबिरात नैसर्गिक आहार, योग, तणाव व्यवस्थापन, जीवनशैलीशी संबंधित आजार, महिला आरोग्य आणि निसर्गोपचार याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. प्रशांत तळवेकर, डॉ. धनंजय पानबुडे, नीलेश वाघ, डॉ. विनोद डोबले, डॉ. सुधीर मोगरे, डॉ. तक्षशीला रामटेके आणि अतुल गेडाम यांनी सहकार्य केले.
.



