द्वारकाधीश मंदिरासाठी महायज्ञ

नागपूर: 

श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने मिहान येथील नियोजित श्री द्वारकाधीश मंदिर व वाटिका निर्माणस्थळी ११ कुंडी एकादश महायज्ञाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अनासाने आणि अध्यक्षा  अंजली अनासाने यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून महायज्ञाचा शुभारंभ करण्यात आला.

मंदिर निर्माणकार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे तसेच परिसरात सुख, शांती व समृद्धी नांदावी, या संकल्पनेतून यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवताचार्य रामदास चेडे महाराज, गजानन हिरुळकर महाराज, अविनाश ठाकरे, माया हाडे, डॉ. गोपाल ढोमणे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.या प्रसंगी मंदिरासाठी भूमिदान करणारे विजय गौतम, विजया गौतम आणि विशेष गौतम यांच्या परिवाराचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे तुळशी व कमळपुष्पाची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. पद्मश्री डॉ. विलास डांगरे आणि डॉ. गिरीश गांधी यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.भविष्यात श्री द्वारकाधीश मंदिर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे महत्त्वपूर्ण केंद्र व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.