नरेंद्र नगर उड्डाणपुलाखालील रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांची मागणी
नागपूर,
नरेंद्र नगर उड्डाणपुलाखालील परिसराचे नागपूर महानगरपालिकेतर्फे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले असून, लवकरच येथे लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे परिसराची शोभा निश्चितच वाढणार आहे.
मात्र, याच ठिकाणी मागील एक वर्षापासून रस्त्याची अत्यंत खराब व दयनीय अवस्था झाली आहे. ‘नरेंद्र हाईट्स’ समोरील या मार्गावरून नरेंद्र नगरमधील विविध कॉलनी तसेच मनीष नगरकडील रहिवासी रोज ये-जा करतात. खराब रस्त्यामुळे येथे दररोज किरकोळ अपघात घडत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय, सिद्धिविनायक गणेश मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.सौंदर्यीकरणाच्या कामांबरोबरच मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे आणि बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे मोठा अपघात होण्याची वाट न पाहता संबंधित प्रशासनाने नरेंद्र नगर उड्डाणपुलाखालील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. यामुळे वाहतुकीला सुलभता येऊन नागरिकांचा त्रास कमी होईल.
संजय श्रौती



