नागपूर :
लोकशाहीत आंदोलन हा घटनात्मक अधिकार असला तरी त्याचे यश नैतिकता, शिस्त आणि मूळ उद्दिष्टांशी असलेल्या प्रामाणिकतेवर अवलंबून असते. सरकारने संवेदनशील प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी वेळेवर संवाद साधल्यास आंदोलने चिघळण्यापूर्वीच मार्गी लागू शकतात, असे मत स्वतंत्र वरिष्ठ पत्रकार डॉ. प्रवीण डबली यांनी व्यक्त केले.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थी व पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने आंदोलन मोठे झाल्यानंतर नव्हे, तर सुरुवातीलाच संवाद साधावा. संवादाला विलंब झाल्यास विविध राजकीय गटांचा हस्तक्षेप वाढून मूळ प्रश्न दुय्यम ठरतात, असेही त्यांनी म्हटले. आंदोलनकर्त्यांनीही अहिंसा, संयम आणि घटनात्मक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीत आंदोलनाचे अंतिम ध्येय संघर्ष नसून समाधान असावे. सरकार आणि आंदोलनकर्ते दोघांनीही संवाद व संयमाचा मार्ग स्वीकारल्यास लोकशाही अधिक सक्षम होईल आणि युवकांचा व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल, असा विश्वास डॉ. डबली यांनी व्यक्त केला.



