लाखनी,
अक्षय नागरिक सहकारी पतसंस्था, लाखनी यांच्या वतीने जिल्हा परिषद गांधी विद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रवींद्रकुमार मेश्राम होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर गिऱ्हेपुंजे, संचालक रायभानजी गायधने व शाखा व्यवस्थापक ईश्वर वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व अभिनंदनपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष चंद्रशेखर गिऱ्हेपुंजे यांनी विद्यालयाला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वॉटर कूलर भेट देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाला पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



