नागपुरात 'शिव कल्याण राजा' स्वराभेषकाचे भव्य आयोजन!
नागपूर:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदीप्यमान राज्याभिषेकाला ३५३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या मंगलमयी दिनाचे औचित्य साधून नागपूरच्या हृदयस्थळी एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'सिताबर्डी मित्र मंडळ' यांच्या वतीने शनिवार, दिनांक ६ जून २०२६ रोजी 'हिंदू साम्राज्य दिन' आणि 'शिवराज्याभिषेक सोहळा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सीताबर्डी मेन रोड येथील श्रीमंत बुटी (रिगल गेट) येथे होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल कार्यालयाचे ज्येष्ठ प्रचारक प्रा. रविंद्र भुसारी आणि दुर्ग प्रतिष्ठान, नागपूरचे अतुलजी गुरु यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सायंकाळी ६:०० वाजता प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी व संच यांच्या सुश्राव्य आवाजात 'शिवकल्याण राजा स्वराभिषेक' कार्यक्रम होईल.
शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करण्यासाठी संध्याकाळी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्याच्या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि शिवरायांच्या चरणी मानवंदना अर्पण करण्यासाठी नागपूरकरांनी आपल्या सहकुटुंब व सहपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'सिताबर्डी मित्र मंडळ' यांनी केले आहे.



