नागपूर 

ग्रामायण प्रतिष्ठान आणि सर गंगाधरराव चिटणवीस मेमोरियल मेडिकल रिसर्च ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या ‘अभ्युदय-सेवा प्रदर्शन-दान महोत्सवा’चा समारोप रविवार, ४ ऑक्टोबर रोजी चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाइन्स येथे झाला.

या प्रदर्शनात विविध सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या संस्थांनी सहभाग घेतला. विशेषतः गडचिरोली, कुरखेडा, धारणी, यवतमाळ, श्रीक्षेत्र कुऱ्हा, वाघाडी यांसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संस्थांनी आपल्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामायण प्रतिष्ठान सातत्याने करीत आहे. तसेच या संस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे हा प्रदर्शनाचा उद्देश आहे.यावेळी ‘इंफोसेप्ट’ या आयटी कंपनीने सामाजिक दायित्वातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या गुणवंत व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.