नागपूर 

मेश्राम लेआउटसह बेसा परिसरात नुकतेच बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते काही दिवसांतच भेगा पडून खराब झाले आहेत. त्यातच गटाराची पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते मधोमध खोदण्यात आल्याने परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ते बांधल्यानंतर काही दिवसांतच अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या. त्यानंतर पाइपलाइनसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यांवर खड्डे, चिखल आणि घसरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.खोदण्यात आलेल्या रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.