नागपूर

महालगी नगरातील गजानन महाराज मंदिरापासून महालगी-बेसा वीज केंद्राकडे जाणारा वर्दळीचा मार्ग पुन्हा खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. काही महिन्यांपूर्वी डागडुजी करूनही रस्ता महिनाभरातच उखडला असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची खडीही बाहेर आली असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.या मार्गावरील दुरवस्था आणि अतिक्रमणाचा मुद्दा यापूर्वीही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने थातूरमातूर डागडुजी करून काही अतिक्रमणे हटविली होती. मात्र काही महिन्यांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे.


मार्गावर सुमारे १५ मोठे खड्डे असून काही खड्डे चार ते पाच फूट खोल असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावर विद्यार्थी, कामगार, दुचाकीस्वार आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. खड्ड्यांमुळे दररोज चार-पाच किरकोळ अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे महापौर याच परिसरातून नियमित ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या नजरेसमोर असलेली रस्त्याची ही दुरवस्था प्रशासनाच्या नजरेत का येत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी वाढत आहे.डागडुजीच्या नावाखाली केवळ मलमपट्टी न करता रस्त्याचे कायमस्वरूपी काम करावे, तसेच अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.