नागपूर -

 जनआक्रोश संस्थेच्या पुढाकाराने प्रतापनगर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी धरमपेठ येथील चिल्ड्रन्स पार्कमध्ये वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका वंदना काळे, धनश्री तरासे, विजय वानखेडे, रेणुका येल्लेवार यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन आले.

यावेळी जनआक्रोश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध वाहतूक नियमांची माहिती दिली. अपघातांची कारणे, वाहतूक सिग्नल, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, पादचाऱ्यांनी रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे, वाहन चालविताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वेगमर्यादा, सुरक्षित अंतर आणि रस्त्यावरील शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर चिल्ड्रन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाहतूक प्रात्यक्षिकातून विविध नियम समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतूक नियमांविषयीच्या ज्ञानात भर पडली.