नागपूर: 

श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट, निर्मल नगरी, नागपूर यांच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर रोजी भव्य नागपूर–कोराडी पायदळ दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हे एक धार्मिक आणि भक्तिपूर्ण आयोजन असून, यामध्ये नागपूर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

दिंडी सकाळी ६ वाजता निर्मल नगरी येथून प्रस्थान करेल. या दिंडीत सहभागी होणारे भाविक सुमारे २० किलोमीटरचा प्रवास करून दुपारी १२.३० वाजता कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात पोहोचतील.

कार्यक्रमाची रूपरेषा

दिंडीच्या प्रस्थानानंतर, दुपारी १ वाजता महाआरती, १.३० वाजता प्रवचन व कीर्तन, आणि दुपारी २ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भक्तांना श्रींच्या नामस्मरणाचा आणि भक्तीचा आनंद घेता येणार आहे.

दिंडी मार्गाने निर्मल नगरी, संस्कारधाम चौक, गणेशपेठ, कॉटन मार्केट, गणेश टेकडी, सदर, झिंगाबाई टाकळी व मानकापूर या ठिकाणांवरून प्रवास केला जाणार आहे.ट्रस्टच्या वतीने नागपूर व परिसरातील सर्व भाविकांना या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.