शिवरायांच्या प्रेरणेतूनच राष्ट्रपुनर्निर्माण शक्य : अतुल गुरू

नागपूर ,

सीताबर्डी मित्र मंडळातर्फे बर्डी मेन रोडवरील श्रीमंत बुटी द्वार (रीगल गेट) येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दुर्ग अभ्यासक अतुल गुरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे देव, देश आणि धर्मासाठीचे योगदान अधोरेखित करत, राष्ट्रपुनर्निर्माणासाठी शिवरायांची प्रेरणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक प्रा. रवींद्र भुसारी होते. महाराष्ट्र सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीशसिंह डागोर यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. शिवभक्तांना विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्यांवरील मृत्तिका कलशाचे दर्शन घडविण्यात आले.

‘शिवकल्याण राजा’ या संगीत कार्यक्रमात गायक अमर कुळकर्णी यांनी शिवचरित्र व राष्ट्रभक्तीपर गीतांची सादरीकरणे करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दीपोत्सव, ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक आतिषबाजीमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.या सोहळ्याला नागपूरातील शिवप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.