नागपूर : 

साधू मंदिरात  पंडित राजा काळे यांच्या गायनाची अनपेक्षित आणि सुरेल मैफिल रंगली. कोणतीही पूर्वसूचना किंवा औपचारिकता नसतानाही संगीतप्रेमींसाठी हा स्वरसोहळा अविस्मरणीय ठरला.

अभिषेकीबुवांच्या समृद्ध शिष्यपरंपरेतील राजा काळे यांनी तोडी आणि यमन रागांचा आपल्या स्वतंत्र शैलीत विस्तार केला. गुरूंचे संस्कार, प्रदीर्घ साधना, संतसाहित्याचा अभ्यास आणि स्वतःचे चिंतन यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या गायकीत जाणवला. त्यांनी अनेक अभंगांना सुरेल चालीही दिल्या आहेत.

मैफिलीदरम्यान गप्पा, विनोद आणि श्रोत्यांशी संवादामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न राहिले. साधू मंदिराचे वातावरण मनाला भावल्याचे सांगत, पुढील नागपूर दौऱ्यात येथे कार्यशाळा घेण्याची इच्छाही राजा काळे यांनी व्यक्त केली.

श्रोत्यांकडून फर्माईशी करण्यात आल्या; मात्र त्यांनी त्या न स्वीकारता आपल्या मनातील स्वरांना प्राधान्य दिले. मैफिलीनंतरही ते बराच वेळ मंदिरात रमले होते. या स्वरमैफिलीला नागपूरचे आघाडीचे तबलावादक सचिन बक्षी यांनी समर्थ साथ दिली. त्यांच्या नेमक्या आणि संवेदनशील तबलावादनामुळे मैफिलीला अधिक रंगत आली.