ज्ञानेंद्रीयांना होणाऱ्या जाणीवेच्या स्पर्शाने कविता स्फुरते आणि फुलते
नागपूर,
प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्य स्पष्ट करत ज्ञानेंद्रियांना होणारी जाणीव जेंव्हा आपल्याला स्पर्शून जाते तेंव्हा तन मनाला जिवंत करते आणि कविता संचारते, आपोआप स्फुरते, फुलते तेंव्हा ती कृत्रिम नसते. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये अधिक प्रगल्भ करायचे काम कविता करते, असे जेष्ठ कवयित्री, गझलकार आणि साहित्य विहारच्या अध्यक्ष आशा पांडे यांनी म्हटले.
नवदृष्टी सभागृहामध्ये स्मिता जोशी जोहरे लिखित आणि 'स्वयं प्रकाशन' द्वारे प्रकाशित 'स्पर्श कवितेचा' या वृत्तबद्ध कविता संग्रहाचे भव्य प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलताना आशा पांडे यांनी स्मिता जोशी यांच्या काव्य रचनांवर सखोल भाष्य केले.
यावेळी साहित्य जगतातील काही प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. साहित्य विहार अध्यक्ष आशा पांडे आणि जयश्री अंबासकर यांच्यासह अनेक कवी आणि रसिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. आशा पांडे यांनी आपल्या भाषणात सांगीतले की, 'वृत्त ही वृत्ती असते आणि प्रत्येक वृत्ताला असलेली वेगळी वृत्ती अभ्यासली तर वृत्त अधिक सकस आणि प्रभावी होतात.'
स्मिता जोशी यांच्या काव्यसंग्रहातल्या रचनांची गोडी व अनुभव यावर आधारित सखोल चर्चा केली गेली. जयश्री अंबासकर यांनी कवितासंग्रहातल्या अनेक वृत्तांचा उल्लेख करून कविता म्हणून दाखवल्या आणि कवितांचे रसग्रहण केले. यावेळी तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या अस्मी बॅंडचे सर्जनशील संगीतकार व सुमधुर गायक सुबोध साठे यांनी या संग्रहातल्या एका गझलेला लावलेल्या चालीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राधा जोशीने सुरेल मंगल स्तवन गायले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तुषार जोशी यांनी केले, तर आभारप्रदर्शन सीमा जोशी यांनी केले. या सोहळ्यात मनिषा अतुल, धर्मेश पराते, वर्षा थोटे, गौरी शास्त्री देशपांडे यांसारखे काव्य रसिक आणि आप्त उपस्थित होते, त्यात देवयानी संदीप जोशी, राजेन्द्र हायस्कूलच्या शिक्षिका आणि लेखक, लेखिकांचा समावेश होता.



