पारंपरिक गीत-नृत्याने रंगला तीज गौरी मातेचा उत्सव

नागपूर, 

 जगदंबा भवानी मातेच्या कृपेने आणि संत श्री सेवालाल बापूंच्या प्रेरणेने नागपूर नगरीत तीज महोत्सव २०२६ भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवात महिला भगिनींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पद्मावती नगर येथे संत श्री सेवालाल बापूंच्या पावन झेंड्याजवळ प्रा. डी. बी. चव्हाण नायक व नितीन राठोड कारभारी यांच्या नेतृत्वाखाली तीज गौरी मातेची विधिवत पेरणी करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात तीज तोडणी व समारोपीय विसर्जन कार्यक्रम झाला.

यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तीज गौरी मातेची स्तुतीपर गीते सादर केली. पारंपरिक गीत-नृत्याने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी तीज मातेची पूजा-अर्चना करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह समाजाच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली.

आधुनिकतेच्या काळातही समाजाच्या रूढी-परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला. विविध भागांतील समाजबांधव एकत्र आल्याने सामाजिक एकोपा व बंधुभावाचे दर्शन घडले.

कार्यक्रमाला आत्माराम राठोड (आयएफएस), इंजि. एन. एस. पवार, प्रा. डॉ. विजय राठोड, गणेश राठोड, रमेश आडे, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.