नागपूर:
हावरापेठ येथील गणपती-हनुमान मंदिरात मागील ३९ वर्षांपासून कार्तिक महिन्यात पहाटे ४.३० वाजता पारंपरिक काकड आरती केली जाते. यंदाही २६ ऑक्टोबर रोजी मंदिरात स्वच्छता, रांगोळी, ध्वजारोहण आणि मूर्तींचे मंगलस्नान व पूजन करून काकड आरतीला सुरुवात झाली.
प्रशांत कामठे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात विविध देवतांच्या भूपाळ्या व संतांच्या अभंगांचे सादरीकरण करण्यात येत आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेनंतर प्रसादाचे वितरण केले जाते.
ही काकड आरती त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत महिनाभर सुरू राहणार आहे. या परंपरेत तुळशीराम गायकवाड, रमेश मेहर यांच्यासह अनेक भाविकांचा पुढाकार आहे.



