नागपूर
स्व. शांताबाई चंद्रभानजी खोबे स्मृतिदिनानिमित्त वात्सल्य मराठी साहित्य समूहातर्फे आयोजित ‘वात्सल्य काव्यसंमेलन’ शंकरनगर येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्माती-दिग्दर्शक माधुरी आशिरगडे होत्या. ज्येष्ठ गायिका सुचित्रा कातरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खोबे, कथाकार नरेंद्र माहुरतळे आणि कादंबरीकार विशाल देवतळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आईच्या वात्सल्याचे ऋण आयुष्यभर जपले पाहिजे, असे मत माधुरी आशिरगडे यांनी व्यक्त केले. लेखक-कवींच्या लेखणीला बळ देण्याचे काम वात्सल्य समूह सातत्याने करीत असून, आईच्या थोरवीला साहित्याच्या माध्यमातून उजाळा द्यावा, असे सुचित्रा कातरकर यांनी सांगितले.संमेलनात सुमारे ३१ कवींनी ‘आई’ या विषयावर कविता सादर केल्या. संजय तिजारे, सुनील वाडे, लीलाधर दवंडे, हितेश गोमासे, राहुल गवस, विजय बेले, प्रकाश भातकुळे, रेखा सोनारे, अलका फुलझले, गौरी तायडे, अर्चना धवड, वर्षा किडे-कुळकर्णी, धनश्री पाटील, स्वाती देशपांडे यांच्यासह अनेक कवींनी सहभाग घेतला.
यावेळी ‘आई वात्सल्याचा झरा’ या विषयावरील कथालेखन स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरणही झाले. प्रथम क्रमांक दिनेश भदाणे (पुणे), द्वितीय अर्चना धवड (नागपूर), तर तृतीय क्रमांक संयुक्तपणे सोनाली धनमने (चंद्रपूर) व मनिषा सोनकांबळे (नांदेड) यांनी मिळविला. डॉ. वंदना पाठक, साईप्रसाद बोभाटे, प्रज्ञा घोडके व आसावरी इंगळे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या ‘माऊली एआय’ कथेचे अभिवाचनही करण्यात आले.सूत्रसंचालन अलका मोकाशी यांनी केले. प्रास्ताविक अर्चना मानकर-पिसे यांनी केले, तर आभार अंकिता निमजे यांनी मानले.



