नागपूर 

नोबेल शांतता पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते नागपूरचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांच्या ‘Death-Defying Doctor – Inspirational Story’ या पुस्तकाचे नवी दिल्ली येथे विशेष समारंभात विमोचन करण्यात आले.डॉ. बोधनकर यांनी पुस्तकातून आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, आव्हाने, ध्येयवाद आणि सामाजिक सेवेचा अनुभव मांडला आहे. बालआरोग्य, बालहक्क, किशोर आरोग्य, युवक विकास आणि मानवतावादी सेवेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचेही पुस्तकात चित्रण करण्यात आले आहे.

हे पुस्तक केवळ वैद्यकीय क्षेत्रातील प्रवासाचे दस्तऐवजीकरण नसून, संघर्षातून मार्ग काढण्याची जिद्द, करुणा, सेवा आणि आशावादाची प्रेरणादायी कहाणी असल्याचे डॉ. बोधनकर यांनी सांगितले.या वेळी त्यांनी कैलाश सत्यार्थी यांचे आभार मानले. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन होणे हा अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे डॉ. बोधनकर यांनी नमूद केले. या भेटीच्या आयोजनासाठी ‘हिंदुस्तान’चे संपादक प्रताप सोमवंशी यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.