*वृत्तांत:-
शीर्षक -- 'दीनानाथ ते हृदयनाथ'ने उलगडला मंगेशकर पर्वाचा सांगितिक प्रवास
मंगेशकर घराणे म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचा वरदहस्ताने लाभान्वित झालेले घराणे. संपूर्ण घराण्याने संगीत सेवेला वाहून दिलेले हे उदाहरण विरळाच. या घराण्याच्या कुटुंब प्रमुखाने म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी पाया रचला, आव्हानात्मक कठीण परिस्थितीत लता दीदींनी वडिलांचा वारसा चालवला आणि इतर भावंडांनी आपल्या संगीत सेवेतून एक एक वीट रचत एक इतिहास घडवला. मंगेशकरांची गाणी'दीनानाथ ते हृदयनाथ' या सुश्राव्य कार्यक्रमाद्वारे नागपुरातील प्रतिष्ठित , दिग्गज गायक व वादक कलाकारांनी 'दीनानाथ ते हृदयनाथ' हा सांगितिक प्रवास गीतांद्वारे उलगडण्याचे शिवधनुष्य पेलले आणि यशस्वीही झालेत .
स्वरसाधना लोकतंत्र सेनानी संघ आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात आयोजित केला होता.
मंगेशकरांचे कुलदैवत मंगेशाची आराधना आकांक्षा चारभाई हिने 'मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश' या गीताने करत कार्यक्रमाचा सुरेल शुभारंभ केला. 'संन्यस्त खड्ग' या नाटकातील पटदीप रागातील 'मर्मबंधातली ठेव ही' हे दीनानाथांनी गायलेलं नाट्यगीत स्वरसाधना अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी अतिशय तयारीने सादर करत मैफिलीत रंग भरला. रसिका करमाळेकर हिने 'मी मज हरपून बसले गं ' व मानापमान नाटकातील 'युवती मना' हे पद, जीवलगा राहिले दूर घर माझे ' उत्कृष्ट गाऊन रसिकांची वाहवाची दाद मिळवली. 'या चिमण्यांनो परत फिरा रे ' हे गीत छाया वानखेडे हिने अतिशय आर्ततेने व भावपूर्ण गाऊन वन्समोअर घेतला. 'मलमली तारुण्य माझे' हे गीत आर्या आंबेकरने ताकदीने पेलले. याशिवाय धुंदी कळ्यांना,तू तेंव्हा तशी, लाजून हासणे, स्वप्नात साजणा येशील का' तुम्हावर केली मी मर्जी बहाल, अखेरचा दंडवत ही गीते ही सुचित्रा कातरकर, पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, आशिष घाटे, विजय देशपांडे, यांनी अतिशय सुमधुरतेने सादर केलीत . कवयित्री सुचित्रा कातरकर यांनी लता दीदींवरील कविता सादर करून आपल्या दैवतास भावपूर्ण स्वरसुमनांजली अर्पण केली. सिंथेसायझरवर आनंद मास्टे,तबल्यावर मोरेश्वर दशसहस्त्र, आशिष घाटे,व तालवाद्यावर विक्रम जोशी यांनी गीतांना व कवितांना स्वरसाज चढवत उत्तम साथसंगत केली.
प्रा.उज्ज्वला अंधारे यांनी बहारदार व नेटके निवेदन केले.
दर्दी रसिकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात सुमधुर गीतांचा स्वरानंद व श्रवणानंद लुटला.



