नागपूर,

आपल्या आतल्या ऊर्मीला झुळझुळत ठेवणे ही सृजनशील मनाची गरज असते. आतले झरे ओसंडून वाहू लागले की ते कधी कधी किनाऱ्याशीही बंड करू बघतात. वाहणे हा त्यांचा मूळ धर्म असतो." असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री मीनल येवले यांनी केलंय.  लेखिका कवयित्री सुचित्रा कातरकर यांच्या पाऊस... काही संदर्भ ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. दि. १० जुलै ला प्रकाशन सोहळा सायंटिफिक सभागृहात संपन्न झाला.

"पाऊस या एका विषयाभोवती कवयित्री, ललित लेखिका असलेल्या सुचित्रा कातरकर यांचे लेखन असेच फेर धरून नाचू लागते. *पाऊस... काही संदर्भ* हे पुस्तकच एक वेगळा प्रयोग आहे. ललित, कविता आणि हायकू हे तीन साहित्यप्रकार एकाच ठिकाणी हातात हात गुंफून एकमेकांना जागा देत ओळीने या पुस्तकात बसलेले आहेत.रचनाबंध वेगवेगळा असला तरी लेखन विषयाचा मूळ गाभा एकच आहे तो म्हणजे पाऊस." असेही पुस्तकावर भाष्य करताना मीनल येवले म्हणाल्या.

ज्येष्ठ कवयित्री सुचित्रा कातरकर यांच्या 'पाऊस काही संदर्भ''चे प्रकाशन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुवर्ण रेखा पाटील यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी व्यासपीठावर स्वरसाधना अध्यक्ष श्याम देशपांडे , पुस्तकाची पाठराखण करणारे साहित्यिक प्रदत्त उर्फ प्रभाकर तांडेकर, लोकतंत्र सेनानी संघ अध्यक्ष बिंदुमाधव देव, जेष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्यक्ष डॉ अविनाश तेलंग, ज्ञानपथ पब्लिकेशनचे प्रकाशक सचिन सुकळकर उपस्थित होते.

 सचिन सुकळकर यांनी लेखिका कवयित्री सुचित्रा कातरकर यांचा सत्कार केला .प्रकाशकाने लेखिकेचा केलेला सत्कार हे निराळे दृश्य सुखद व आशादायी होते.

नेटके सूत्रसंचालन प्रा. उज्ज्वला अंधारे यांनी केले. 

कार्यक्रमाला अनेक साहित्यिकांची उपस्थिती होती.