नागपूर
सेव्हन नोट्स इव्हेंट्स ॲन्ड एन्टरटेन्मेंट’तर्फे सुप्रसिद्ध संगीतकार व गायक आर. डी. बर्मन अर्थात लाडके ‘पंचमदा’ यांना स्वरसुमनांजली अर्पण करणारा ‘मॅजिकल पंचम’ हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडला. प्रा. पद्मजा सिन्हा व मुकुल पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना जुन्या हिंदी गीतांच्या सुरेल आठवणींत रमविले.
‘रात कली एक ख्वाब में आयी’ या गीताने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर ‘रैना बित जाये’, ‘नाम गुम जायेगा’, ‘न जा कहीं अब न जा’, ‘गुम है किसीके प्यार में’, ‘कांटा लगा’, ‘बचना है हसीनो’, ‘एक मैं और एक तू’, ‘पिया तू अब तो आजा’ यांसह आर. डी. बर्मन यांची सुमारे ३० लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. गायकांच्या दमदार सादरीकरणाला वाद्यवृंदाची तगडी साथ लाभल्याने सभागृहात सुरांची रंगत वाढत गेली.
प्रा. पद्मजा सिन्हा, मुकुल पांडे, डॉ. सुधीर कुणावार, आरती बुटी, अस्मिता शिवलकर, अविनाश व मनिषा चन्ने, रवी राजन, सोनाली अय्यर, गणेश जयस्वाल, विनय गायधने, स्मिता देशमुख, मुकुल नांदे, रजनी ठाकरे व हेमंत राऊत यांनी गीते सादर केली. अनेक गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त ‘वन्स मोअर’ची दाद देत कलाकारांचा उत्साह वाढविला.सचिन ढोमणे (तबला), आर्य पुरनकर (सिंथेसायझर), सुभाष वानखेडे (ऑक्टोपॅड), अशोक टोकलवार (ढोलकी) व मनोज विश्वकर्मा (गिटार) यांनी वाद्यसाथ केली.



