कोमल ढवळेने उंचावली शहराची मान

नागपूर,

कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील कोमल गुणवंत ढवळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोमलने राज्यातील मुलींमध्ये ७ वी, तर ओबीसी प्रवर्गातून ४ थी रँक मिळवत संपूर्ण मोहपा नगराचे नाव उज्वल केले आहे.

कुटुंबाची भूमिका

कोमल ही मोहप्याचे रहिवासी ललिता आणि गुणवंत ढवळे यांची कन्या आहे. कुटुंबाच्या मार्गदर्शनाने आणि अथक परिश्रमांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. गुणवंत ढवळे यांनी २००७ साली झालेल्या मोहपा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरून उमेदवारी दिली होती.

स्थानिकांचा अभिमान

आज त्यांच्या कन्येने राज्यस्तरीय स्पर्धेत झळकावलेले यश हे केवळ कुटुंबासाठी नव्हे तर मोहप्याच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. स्थानिक सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळातून कोमलचे अभिनंदन होत असून, पुढील कार्यकाळात ती राज्यसेवेतून लोकहितासाठी उल्लेखनीय कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अभिनंदनाचा जल्लोष

कळमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती श्रावणदादा भिंगारे, माजी नगराध्यक्ष शोभा सागर कौटकर, श्रीकायेनूरकर, इमेश्वर यावलकर, प्रवीण श्रोते, माधव चर्जन यांच्यासह मोहपा नगरातील प्रत्येक नागरिकांनी अभिनंदन केले.