वानाडोंगरी येथील दत्ता मेघे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे औषधी वनस्पतींच्या साहाय्याने आयुर्वेदीय औषधनिर्मितीचे थेट प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले. या विशेष उपक्रमात विश्वकुंभ आयुर्वेदिय चिकित्सालयाचे संचालक डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर व डॉ. वासवी तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमात २५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. वनस्पतींची शास्त्रशुद्ध ओळख, संकलन, प्रक्रिया आणि औषधनिर्मितीचे टप्पे प्रत्यक्ष प्रदर्शनासह सविस्तर समजावून देण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः सहभाग घेत औषध तयार करण्याचा प्रयोगात्मक अनुभव मिळवला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान अधिक दृढ झाले असून, पारंपरिक आयुर्वेद शास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधण्याची गरज असल्याचे डॉ. पुसदकर व डॉ. तोटावार यांनी अधोरेखित केले. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारा हा उपक्रम ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.



