नागपूर: 

हावरापेठ मित्र परिवाराच्या वतीने भगवान क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त १५ नोव्हेंबर रोजी सकाळी हावरापेठ येथील समाजभवन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शासकीय आदिवासी वसतिगृहाचे माजी अधीक्षक गजेंद्र मडावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्याम चौधरी आणि भाजप शहर कार्यकारिणी सदस्य मंगेश मोरे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी तसेच जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी युवकांचे संघटन करून ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला. जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या महान योगदानाची आठवण म्हणून १५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशभरात गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी जयघोष करून समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मेहर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश बांगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय उईके, बबलू वरठी, राजू इटनकर, राजू गायकवाड, लक्ष्मण सातपुते, सोबीत गुप्ता आणि शिवम बांगडे यांनी परिश्रम घेतले.