नागपूर :

शहरातील अनेक रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी) हलक्याशा पावसातही पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना दरवर्षी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उप्पलवाडी, नरेंद्र नगर, गड्डी गोदाम, लोहापुल, मनीष नगर आणि बिनाकी मंगलवारी परिसरातील आरयूबीमध्ये पाणी साचून वाहतूक विस्कळीत होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरण व जल संवर्धन कार्यकर्ते डॉ. प्रवीण डबली यांनी केली आहे.

डॉ. डबली यांच्या मते, बहुतांश आरयूबीमध्ये योग्य जलनिचरा व रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था नसल्याने ही समस्या निर्माण होते. सर्व अंडर ब्रिजमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसविणे, सरकारी इमारतींमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.