नागपूर
तुर्कीतील इस्तंबूल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारतासह नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या रोहिणी पाटील रामटेके यांचा साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
रोहिणी पाटील रामटेके यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या कामगिरीतून क्रीडा क्षेत्रात मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश मिळविता येते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यांच्या यशामुळे नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे.साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रोहिणी यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



