नागपूर: 

दिवाळी म्हटले की बच्चे कंपनीसाठी मोठा उत्साहाचा पर्व किल्ला करणे, आकाशदिवे बनविणे ही तर त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच असते. हिच बाब लक्षात घेऊन प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालीत प्रतापनगर कॉन्व्हेंट व प्राथमिक शाळेत दिवाळीनिमित्त लहान चिमुकल्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ही लहान चिमुकले रंगबिरंगी वेशभषा परिधान करून पालकांसह शाळेत दाखल झाले. घरून तयार करून आणलेल्या आकाश दिव्यांनी त्यांनी वर्ग सजविला व नेपाळमध्ये झालेल्या नैसर्गिक आपदांचा देखावा सादर केला.

मुख्य कार्यक्रम शाळेच्या प्रागणात घेण्यात आला. याप्रसंगी या लहान बालगोपालांनी दिवाळी आधारित नृत्याचे विविध प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली व भाऊबीज निमित्ताने एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. पालकांनाही आपल्या पाल्याच्या नृत्याची पर्वणी अनुभवता आली या कार्यक्रमात प्रतापनगर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकर पहाडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. तसेच उत्तम संस्कार गिरविण्याचे काम शाळेतील शिक्षक करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाला संस्थेच्या पदाधिकारी अनुपमा नाफडे सह माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर, मुख्याध्यापक श्रावण सुरकार प्रामुख्याने उपस्थित होते.