६० वर्षांच्या परंपरेतील बाप्पाला भावपूर्ण निरोप
नागपूर:
दिव्य नगरी, गोधनी परिसरातील शेषराव लोहे यांच्या घरी विराजमान श्री गणेशाच्या उत्सवाला यंदा ६० वर्षे पूर्ण झाली. गेल्या दहा दिवसांपासून घरातील लहान-मोठ्यांनी बाप्पाची सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चना, आरती, सामुदायिक प्रार्थना आणि भजनसंध्येचे आयोजन करत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. अनंत चतुर्दशीला कृत्रिम विसर्जन कुंडात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी विशेषतः लहान मुलांचे डोळे पाणावले होते.
दहा दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनात माया लोहे, अंकिता लोहे, मोनाली ढोबळे, यश लोहे आणि निशांत ढोबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उत्सवात सर्व वयोगटातील लोकांनी भाग घेतला, ज्यात लहान मुलांचे विशेष लक्ष वेधून घेतले गेले.



