नागपूर : 

दिवाळीच्या सणात नागरिक फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात मग्न असताना, शहरात तब्बल ६० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. अशा कठीण प्रसंगी स्वतःची दिवाळी बाजूला ठेवून नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता वाचविण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या नरेंद्र नगर अग्निशमन केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा माऊली सेवा मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

नरेंद्र नगर येथील अग्निशमन केंद्रात आयोजित या छोटेखानी सत्कार सोहळ्यात मंडळाचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या कर्तव्याची आणि सेवाभावी कार्याची समाजातील कोणीतरी दखल घेतली, या भावनेने सत्कार स्वीकारताना अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सण-उत्सव विसरून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मंडळाचा हा उपक्रम उपस्थितांसाठी भावनिक ठरला. या उपक्रमातून माऊली सेवा मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत अग्निशमन विभागाच्या कार्याचा गौरव केला.