नागपूर:
शिवनगर येथील शिवमंदिरात कार्तिक एकादशी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त पहाटे विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे मंगलस्नान व पूजन चंद्रकांत चांदेकर आणि शशीकला चांदेकर या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले.
शरद पौर्णिमेपासून येथील महिला मंडळातर्फे दरवर्षी काकड आरतीचे आयोजन केले जाते. यंदा शिवनगर महिला काकड आरती मंडळ आणि हावरापेठ पुरुष काकड आरती मंडळ यांनी एकत्रितपणे शिवमंदिरात काकड आरतीचे सादरीकरण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात झालेल्या या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसाद व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.या काकड आरतीच्या आयोजनासाठी अंजली गाथाडे, तुळशीराम गायकवाड, शेखर अरणे, सुनीता गायकवाड, श्रावण चरपे, ज्ञानेश्वर थुटे आणि सुरेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.



