नागपूर:
हावरापेठ येथील गणपती-हनुमान मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्तिक महिन्यानिमित्त मंदिरात महिनाभर काकड आरतीचा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या ३९ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही कायम राखण्यात आली.
त्रिपुरी पौर्णिमेला पहाटे ४.३० वाजता प्रशांत कामठे यांच्या हस्ते मूर्तींचे मंगलस्नान, दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात रामधुन दिंडी व पालखी प्रभातफेरी काढण्यात आली. संतांचे अभंग व भजनांनी परिसर भक्तिमय झाला.प्रभातफेरी दरम्यान विविध देवस्थानांमध्ये पूजन करण्यात आले. मंगेश मोरे यांनी भाविकांचे टिळा, शेला, श्रीफळ व पुष्पवृष्टीने स्वागत केले. मयूर हिंगणे व देशमुख परिवारातर्फे चहा-पाण्याची, तर जानबाजी कामठे यांच्यातर्फे अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली.यावेळी रमेश मेहर यांनी कार्तिक महिन्यातील काकड आरती व प्रभातफेरीचे महत्त्व विशद केले. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.



