रामटेक,

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नागपूर ग्रामीण पोलीस व रामटेक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली.


उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन येथून दौड सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.यावेळी डॉ. बापू सेलोकर यांनी नियमित व्यायाम व सकस आहाराचे महत्त्व सांगितले. पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशाच्या एकीकरणातील योगदानाची माहिती दिली. तर डीवायएसपी रमेश बरकते यांनी पटेल यांच्या कणखर नेतृत्वातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.या दौडीत पोलीस अधिकारी व कर्मचारी, सृष्टी सौंदर्य परिवार, लक्षवेध अकादमीचे सदस्य तसेच रामटेकमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.