भार्गव मोकदमची विभागीय जलतरण स्पर्धेत सुवर्णभरारी

रामटेक: स्थानिक पातळीवर जलतरणासाठी पुरेशा सुविधा नसतानाही, राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी भार्गव वेदप्रकाश मोकदम याने विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले आहे. वर्धा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत त्याने १०० व २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात दोन सुवर्ण, तर २०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात एक रजत पदक पटकावत थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.

खिंडसी तलावाच्या खुल्या पाण्यातून जलतरणाचे प्राथमिक धडे गिरवणाऱ्या भार्गवला वडील वेदप्रकाश मोकदम व सृष्टी सौंदर्य मित्र परिवारचे भक्कम पाठबळ लाभले. सध्या तो नागपूर येथे प्रशिक्षक आनंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

प्रशिक्षण आणि यश

गेल्या दोन वर्षांपासून तो नियमित नागपूर येथे जाऊन सराव करत असून सध्या नागपूरच्या कामगार कल्याण केंद्राच्या तलावावर नामांकित प्रशिक्षक आनंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहे. पुरेशा स्थानिक सुविधा नसतानाही ग्रामीण भागातील मुले योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण परिश्रमाने राज्यस्तरापर्यंत पोहोचू शकतात, याचे भार्गव उत्तम उदाहरण ठरला आहे.

अभिनंदन

या उल्लेखनीय यशाबद्दल माजी आमदार आनंदराव देशमुख, मयंक देशमुख, अंशुल देशमुख, प्राचार्य चन्ने, सृष्टी सौंदर्य परिवार व क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे.