नागपूर:
पांढराबोडी तलावातील गाळ काढण्याचे व खोलीकरणाचे काम पूर्ण होऊन महिन्याहून अधिक काळ लोटला असतानाच परिसरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. यामुळे तलावाची स्थिती गंभीर झाली आहे.‘सेव्ह पांढराबोडी मिशन’अंतर्गत सामाजिक संस्थांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ केला होता, परंतु संजय नगर वस्तीलगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने पाण्याचा प्रवाह अडून तलावाचे डबक्यात रूपांतर झाले आहे. यामुळे जैवविविधता व भूजल पातळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्थानिक सदस्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे कचरा रोखण्यासाठी जाळीचे कुंपण आणि पाणलोट क्षेत्राची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी तलावाचे नैसर्गिक स्वरूप जपत तातडीने पुनरुज्जीवन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.कचऱ्यामुळे तलावाच्या पारिस्थितिकीवर आणि स्थानिक समुदायावर गंभीर परिणाम होत आहेत. यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा पांढराबोडी तलावाचा ऱ्हास थांबविणे कठीण होईल.



