जैन सेवा मंडळाची पर्यायी जागेची मागणी

नागपूर, 

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात श्री जैन सेवा मंडळाला शासनाने सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी मंजूर केलेल्या जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने मंडळाने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात मंडळाच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश गावंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर जागा मंडळाला परत मिळावी किंवा उपक्रमांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.शासनाकडून जागा उपलब्ध झाल्यापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी येथे भगवान महावीर स्वामी जयंती उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त ध्वजारोहण, अहिंसा स्कूटर व कार रॅली तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, मंडळाच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेवर बांधकाम सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने मंडळाशी कोणतीही चर्चा केलेली नाही किंवा याबाबत पूर्वसूचना दिलेली नाही. त्यामुळे मंडळाच्या नियमित उपक्रमांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. गावंडे यांना निवेदन देऊन मंडळाच्या सामाजिक व धार्मिक कार्यात खंड पडू नये, यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी त्यांनी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुमत लल्ला, महामंत्री डॉ. दीपक शेंडेकर, उपाध्यक्ष संजय टक्कामोरे, माजी अध्यक्ष दिलीप गांधी, सुरेश डायमंड, डॉ. चंद्रनाथ भागवतकर, मिलिंद वाचनेकर आणि हरप्रित गांधी यांचा समावेश होता.